“राणेंची क्षमता गृह, संरक्षण, अर्थ खाते सांभाळण्याची म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव” – सामना

 

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात जुन्या नेत्यांना डावलून काही नवीन चेहऱ्यांवर खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातून भाजपा नेते नारायण राणे, भागवत कराड तसेच भरती पवार या पक्षात आलेल्या आयारामांना संधी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंडे भगिनी नाराज असल्याच्या जोरदार चर्चा महाराष्ट्रात सुरु आहे. याच मुद्दयावरून आजच्या सामना अग्रलेखातून टोला लागवण्यात आला आहे.

भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकविण्यासाठीच हे केले काय, अशी शंका घ्यायला जागा आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

महाराष्ट्रातून अखेर नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली हे बरेच झाले. तेसुद्धा मूळचे भाजपचे नाहीत. शिवसेना, काँग्रेस व आता भाजप असा त्यांचा प्रवास मनोरंजक आहे. राणे यांना अधिक महत्त्वाचे खाते मिळेल असे वाटले होते, पण लघु व मध्यम उद्योग असे एक खाते त्यांना दिले. म्हणजे ते धड उद्योगमंत्रीही नाहीत किंवा व्यापारमंत्री नाहीत. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे, त्यांना नेहमीचे ठरलेले अवजड उद्योग खाते दिले नाही.

राणे यांना लघु व मध्यम उद्योगांची सध्याची स्थिती पाहून पावले टाकावी लागतील. देशातले उद्योग, व्यापार पूर्ण मेटाकुटीस आला आहे. लहान उद्योगांना तर जिवंत राहणे अवघड झाले. अशा वेळी राणे काय करणार ते पाहायला हवे. खरे तर राणे हे जास्त क्षमतेचे गृहस्थ आहेत. त्यांची क्षमता गृह, संरक्षण, अर्थ अशी देशपातळीवरची खाती सांभाळण्याचीच आहे, पण आता त्यांना लघु उद्योगात चमक दाखवावी लागेल असे अग्रलेखात म्हंटले आहे.

Team Global News Marathi: