रामदास कदमांचे पुत्र आमदार योगेश कदमांची मंत्री पदी लागू शकते वर्णी

 

शिंदे आणि भाजपचे सरकार स्थापन झाल्यापासून पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांना डावलण्यात आले. आता राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे, असे स्पष्ट संकेत राज्याचे उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यानंतर राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. आमदारांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून शिंदे गटाचे प्रतोद आणि महाड-पोलादपूरचे आमदार भरत गोगावले यांच्यासह आमदार योगेश कदम यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते.

सध्या मंत्रीमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २० मंत्री आहेत. यात भाजपचे नऊ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे ९ मंत्री असून विस्ताराच्या दुसऱ्या टप्यात भारतीय जनता पक्षाचे आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी चार आमदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या वेळी राज्यमंत्रीपदे भरण्यात येणार आहेत.

शिंदे गटात अनेक आमदार इच्छुक आहेत. पहिल्या विस्ताराच्या वेळी शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांचे नाव ऐनवेळी कट झाले होते. यावेळी त्यांना निश्चित संधी मिळेल, असे बोलले जात आहे. कोकणातून माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र आणि दापोलीचे आमदार योगेश कदम यांनाही मंत्रीपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात कोकणला दोन मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे .

Team Global News Marathi: