राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी आगामी काळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, असं साकडं देवीला घातलं आहे. तसंच, मी मुख्यमंत्री व्हावं असा विचार कधी केला नाही,याचा निर्णय राज्याची जनताच घेईल, अशी प्रतिक्रियाही सुळे यांनी दिली. सुप्रिया सुळे उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहे. आज दुपारी त्यांनी आपला पदाधिकाऱ्यांसह तुळजाभवनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याकडून देवीला साकडं घालण्यात आले.
‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार’ असं साकडं सुप्रिया सुळे यांनी घातलं. ‘खरंतर आपल्याला काय मिळाले, याबद्दल देवळात आभार मानण्यासाठी येत असते. मंदिरात आल्यानंतर इथं जमलेले कार्यकर्ते आणि पुजारी यांनी काही तरी मागणी करावी अशी मागणी केली होती. त्यावेळी राज्यात चांगला पाऊस पडू दे, देशातला शेतकरी अडचणीत सापडलेला आहे.
त्याला दिलासा मिळू दे, असं साकडं घातलं, असं सुळे यांनी सांगितलं. यावेळी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी होणार, असं पत्रकरांनी विचारले असता, सुळे म्हणाल्या की, ‘ मी याबद्दल काही सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष्य सांगणारी नाही. मी मुख्यमंत्री व्हावं याबद्दल कधी विचार केला नाही. महाराष्ट्राची जनता ही राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवेल, मी ठरवू शकत नाही’ असं स्पष्ट उत्तर सुळे यांनी दिलं.