राजसाहेब, गजानन काळेंची मनसेतून तात्काळ हकालपट्टी करा, तृप्ती देसाईंची मागणी |

 

मुंबई | मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी पतीविरोधात मानसिक आणि शारीरिक छळासह विवाहबाह्य संबंधांचा आरोप केला आहे. या आरोपणानंतर गजानन काळे यांच्यावर सर्व बाजूंनी टीका होत होते. या विरोधात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी तात्काळ कारवाई करण्यात यावी असे विधान केले होते आता त्या पाठोपाठ गजानन काळेंची नवी मुंबई मनसे शहराध्यक्षपद आणि मनसेतून हकालपट्टी करावी अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.

“गजानन श्रीकृष्ण काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीने नवी मुंबई पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मात्र दोन दिवस झाले आरोपीला अटक झालेली नाही. त्यानंतर संजीवनी काळे यांना पोलीस सांगतात की तुम्ही एफआयआर मागे घ्या किंवा सेटलमेंट करा, तडजोड करा. एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर महिलेला न्याय देण्याचं काम पोलिसांचं असतं, सेटलमेंट करण्याचं नाही.” असं तृप्ती देसाई यांनी बोलून दाखविले होते.

“राज्यामध्ये गृहमंत्री काय करत आहेत, एखादी महिला अन्याय झाल्यानंतर वाचा फोडते, गुन्हा दाखल करते, त्या आरोपीला पहिलं अटक करा ना, तातडीने गजानन काळेंना अटक झाली पाहिजे. ते मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना माझी विनंती आहे, आपण महिलांच्या सन्मानासाठी काम करता, परंतु गजानन काळेंनी ज्या पद्धतीने शारीरिक, मानसिक त्रास संजीवनी काळेंना दिला आहे. त्यावर मनसेची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळे आपण तातडीने आपण मनसेच्या सर्व पदावरून हकालपट्टी करावी, अशी भूमाता ब्रिगेडची मागणी आहे असंही तृप्ती देसाई म्हणाल्या.

Team Global News Marathi: