राजभवनाकडे निघाला होता मोर्चा आणि जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात केलेल्या विधानावरुन राज्यात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. राजस्थानी आणि गुजराती नसतील तर मुंबईत पैसाच राहणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राजभवनावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाणे पोलिसांनी डॉ.जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांना आनंदनगर येथे ताब्यात घेतले.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आव्हाड यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना कोपरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. आनंद परांजपे, नजीब मुल्ला यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना आनंदनगर येथे पोलिसांनी ताब्यात घेत राजभवनावर जाण्यापासून रोखले. यावेळी, बोलताना आव्हाड यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टिका केली.

महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राच्या मातीचा अपमान कोणी ही सहन करणार नाही. जेव्हा त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर वक्तव्य केले होते तेव्हाच त्यांना हकलण्याची वेळ आली होती. पण, आता अती झाले. मराठी माणूस भिकारी आहे असं त्यांना वाटत असेल तर मराठी माणूस भिकारी नाही. या मातीने अनेकांना श्रीमंत केले आहे, पण मराठी माणूस संस्कृतीने आणि संस्काराने श्रीमंत आहे, असे आव्हाड यांनी म्हटले.

Team Global News Marathi: