पाऊस: राज्याच्या ‘या’ भागात पुढील पाच दिवसांसाठी ‘रेड अलर्ट’; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

पाऊस: राज्याच्या ‘या’ भागात पुढील पाच दिवसांसाठी ‘रेड अलर्ट’; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

 

पुणे : मॉन्सूनच्या सरीने राज्यातील बहुतांश भागात जोर धरला आहे. कोकण, मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. मध्य महाराष्ट्रातही बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. येत्या चार ते पाच दिवस संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना चार ते पाच दिवसांसाठी रेड अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.

गेल्या आठवड्यात कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाने ओढ दिली. तर गडचिरोली आणि चंद्रपूर वगळता उर्वरित विदर्भातही पाऊस पडला नाही. परिणामी, राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने भर पावसाळ्यात उन्हाळा अनुभवायला मिळाला. जळगावमध्ये तर कमाल तापमानाचा पारा चाळिशीवर पोचला. मात्र दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पुन्हा हवेत गारवा तयार झाल्याने कमाल तापमानाचा पारा घसरला आहे. शुक्रवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंत नांदेड येथे ३७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

 

पुढील दोन्ही आठवड्यांतील कमाल आणि किमान तापमानाचा अंदाजही हवामान विभागाने जाहीर केला आहे. यात पहिल्या आठवड्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाच्या काही भागांत कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या वर ते सरासरी इतके राहणार आहे. तर दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या हजेरीनंतर कमाल तापमानात घट होणार आहे. अनेक भागांत किमान तापमान सरासरी इतके राहण्याचा अंदाज आहे.

पुढील पंधरा दिवस सर्वदूर पावसाची शक्यता
येत्या दोन आठवड्यांमध्ये पडणाऱ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. यात पहिल्या आठवड्यात (९ ते १५ जुलै) राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात होणार आहे. पूर्व मराठवाडा आणि लगतच्या विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

दुसऱ्या आठवड्यातही (१६ ते २२ जुलै) राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून, कोकणासह, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल. उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मॉन्सूनची वाटचाल सुरू होणार

गेले अनेक दिवस उत्तर भारतात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) प्रवास मंदावला होता. मागील दोन दिवसांपासून पोषक वातावरण तयार झाल्याने वाटचाल सुरू होणार आहे. आज (शनिवारी) दिल्लीसह, पंजाब हरियाना, राजस्थानच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली.

 

येथे होणार जोरदार पाऊस :

शनिवार – ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, बुलडाणा, हिंगोली, नांदेड, वाशीम, यवतमाळ
रविवार – संपूर्ण कोकण, कोल्हापूर, पुणे, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली

सोमवार – संपूर्ण कोकण, कोल्हापूर, पुणे, सातारा, कोल्हापूर, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, वाशीम
मंगळवार – संपूर्ण कोकण, कोल्हापूर, पुणे, सातारा, कोल्हापूर, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर

ग्लोबल न्युज नेटवर्क: