लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठीही ‘वाझे ‘ हवेत का ?

राज्य लोकसेवा आयोगाच्या ४ रिक्त जागा ३१ जुलैपूर्वी भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. आता त्यांनी ही पदे भरण्यासाठी अजितदादांनी ३० सप्टेंबरची मुदत दिली आहे. ही चालढकल पाहता सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठी आघाडी सरकारला एखाद्या ‘वाझे’ ची प्रतीक्षा आहे का, असा खोचक सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

प्रसिद्धी पत्रकात भांडारी यांनी म्हटले आहे की, आयोगाचे एकूण ६ सदस्य असतात. या पैकी ४ सदस्यांच्या जागा अनेक महिन्यांपासून भरल्याच गेल्या नाहीत.आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त जागा ३१ जुलैपूर्वी भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. ही मुदत संपल्यावर अजितदादांनी या जागा भरण्यासाठी ३० सप्टेंबरचा मुहूर्त जाहीर केला आहे. लोकसेवा आयोग सदस्यांच्या जागा भरण्यासाठी एवढा वेळ लागण्याएवढा हा जटील विषय नाही.

‘योग्य’ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी आघाडी सरकार एखाद्या वाझेंची वाट पहात असावे अशी शंका येऊ लागली आहे. आयोग सदस्यांच्या रिक्त जागा भरल्या न गेल्याने लोकसेवा आयोगाला पूर्ण क्षमतेने काम करता येत नाही. परीक्षा घेणे, निकाल लावणे, पदांची भरती करणे अशी आयोगाची अनेक कामे वेळेत पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होतात. या दिरंगाईचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. शेकडो होतकरू युवक परीक्षा होण्याची आणि परीक्षांचा निकाल लागण्याची वाट बघत राहतात. लोकसेवा आयोगाच्या दिरंगाईमुळेच स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली हे लक्षात घेऊन राज्य सरकारने आयोग सदस्यांच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात, असेही श्री. भांडारी यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Team Global News Marathi: