केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यापासून विरोध विविध मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असून आता देशात वाढत्या बेरोगारीवरून पुन्हा एकदा काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस काँग्रेस देशभरात साजरा करणार आहे. १७ सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस आहे. हा दिवस युथ काँग्रेस राष्ट्रीय बेरोजगारी दिवस म्हणून साजरा करणार आहे. बेरोजगारी दिवसाच्या अंतर्गत काँग्रेसकडून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल.
दरवर्षी २ कोटी रोजगार देऊ असं आश्वासन नरेंद्र मोदींनी सत्तेत येण्याआधी दिलं होतं, याची आठवण युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांनी करून दिली. रोजगाराचं आश्वासन देऊन सत्तेवर आलेले मोदी आज रोजगाराबद्दलच गप्प आहेत. देशातील बेरोगजारीचा दर २.४ टक्क्यांवरून १०.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. तरुणांना रोजगार देण्यात सरकार असमर्थ ठरलंय, अशी टीका श्रीनिवास यांनी केली.
१७ सप्टेंबरला देशात युवा काँग्रेस राष्ट्रीय बेरोजगारी दिवस साजरा करेल. ज्या व्यक्तीनं हम दो हमारे दोच्या अंतर्गत देशातील तरुणांना बेरोजगार केलं, त्यांचा १७ सप्टेंबरला वाढदिवस आहे. यानिमित्तानं राष्ट्रीय बेरोजगारी दिवस साजरा करूया, असं आवाहन श्रीनिवास यांनी केलं आहे. आता काँगेसच्या या बेरोजगार दिवस साजरा करण्याच्या विषयावरून भाजपा काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.