कोरोना लक्षणे नसलेल्या रुग्णांना आता औषधांची गरज नाही; केंद्र सरकारची सुधारित नियमावली जाहीर

केंद्र सरकारकडून लक्षणे नसलेल्या आणि हलकी लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सुधारीत नियमावली जारी केली आहे.

नवी दिल्ली – कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत आहे. भारतात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळले आणि मृत्यूही झाले. दिवसाला जवळपास 4 लाख इतके रुग्ण भारतात गेल्या महिन्यात आढळत होते. आता हीच संख्या एक लाखापर्यंत खाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून लक्षणे नसलेल्या आणि हलकी लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सुधारीत नियमावली जारी केली आहे. य़ा अंतर्गत अँटिपायरेटिक आणि अँटिट्यूसिव्ह वगळता इतर सर्व औषधे बंद करण्यास सांगितले आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या सुधारीत गाइडलाइननुसार, लक्षणे नसलेल्या आणि हलकी लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टरांकडून देण्यात येणाऱ्या औषधांमध्ये बदल करण्यात आला आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, आयव्हरमेक्टिन, डॉक्सीसायक्लीन, झिंक, मल्टीव्हिटॅमिन आणि इतर औषधे बंद करण्यात आली आहेत. तर तापासाठी अँटिपायरेटिक आणि सर्दीसाठी अँटिट्यूसिव्ह औषधे दिली जातील असं सांगण्यात आलं आहे.

नव्या नियमावलीत डॉक्टरांनी रुग्णांच्या अनावश्यक चाचण्या करू नयेत असंही सांगितलं आहे. यामध्ये सीटी स्कॅन सारख्या चाचण्यांचा समावेश आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि हात धुण्याचा सल्ला दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला असेल तर त्याला फोनवरून सल्ला घेण्याचा आणि पौष्टिक अन्न खाण्यास सांगितलं आहे.

कोरोना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांनी एकमेकांशी फोनच्या माध्यमातून संपर्कात रहा आणि सकारात्मक चर्चा करण्यास सांगितलं आहे. यामध्ये असंही सांगितलं आहे की, ज्या रुग्णांमध्ये लक्षणं नाहीत त्यांच्यासाठी कोणतीही औषधे सांगण्यात आलेली नाहीत. त्यांना इतर कोणताही आजार नसावा अशी अट आहे. तसंच ज्यांच्यामध्ये हलकी लक्षणं आहेत, त्यांनी स्वत:च ताप, श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा ऑक्सिजन पातळी चेक करण्यास सांगण्यात आलं आहे.

कोरोना व्हायरसची लक्षणं असलेल्या रुग्णांनी अँटिपायरेटिक आणि अँटिट्यूसिव्ह औषध घ्यायला हवं. खोकल्यासाठी बूडसोनाइडच्या 800 एमजी औषधाचा डोस दिवसात दोन वेळा आणि पाच दिवसांपर्यंत घ्यायला हवा.

ग्लोबल न्युज नेटवर्क: