पाकिस्तानी चित्रपट ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ बाबत अमेय खोपकर यांचे ट्वीट

 

‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ या पाकिस्तानी चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट 13 ऑक्टोबरला रिलीज झाला. ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ मध्ये अभिनेता फवाद खान आणि अभिनेत्री माहिरा खान यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

हा चित्रपट पकिस्तानासोबतचन अन्य काही देशांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ या चित्रपटाबाबत एक ट्वीट शेअर केलं आहे. त्यांच्या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, ‘फवाद खानचा ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. चीड आणणारी गोष्ट म्हणजे भारतीय कंपनी चित्रपट प्रदर्शनासाठी पायघड्या घालतेय. राजसाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही हा चित्रपट राज्यासह देशभरात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही.’ ‘नाही म्हणजे नाहीच. फवाद खानचे जे कुणी देशद्रोही फॅन्स असतील त्यांनी खुशाल पाकिस्तानमध्ये जाऊन सिनेमा बघावा.’ असंही अमेय खोपकर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले.

अमेय खोपकर यांनी या आधी देखील पाकिस्तानी कलाकारांबाबत ट्वीट शेअर केलं होतं. त्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं होतं, ‘बॉलिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलाय, असं कानावर येतंय. म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दात इशारा देतोय की फक्त मुंबईच काय, हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील.’

Team Global News Marathi: