पुन्हा एकदा माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप !

 

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, ठाकरे सरकारकडून करण्यात येत असलेल्या चौकशीला परमबीर सिंग यांनी आव्हान देत यावेळी ठाकरे सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात लिहिलेले पत्र मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे.

तसेच आपल्याविरोधात एकापाठोपाठ एक गुन्हे राज्य सरकार दाखल करणार असल्याची माहिती मिळाल्याचा दावा परमबीर सिंह यांनी केला आहे. ४ मे रोजी उच्च न्यायालयात त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.  गृहमंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. उच्च न्यायालयाने परमबीर आणि अन्य दोघांनी केलेल्या जनहित याचिका रद्द केल्या होत्या.

नियुक्ती किंवा बद्दल्यांबाबत काही तक्रारी असतील तर त्यांनी योग्य त्या व्यासपीठाकडे दाद मागावी. कारण त्यांनी केलेले आरोप हे सेवेशी संबंधित असल्याचे त्यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले होके. दरम्यान यावेळी देशमुख व सिंह यांच्यासह याप्रकरणी गुंतलेल्यांविरोधात केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची अ‍ॅड. जयश्री पाटील यांची याचिकाही न्यायालयाने निकाली काढली होती. त्यातच अकोल्यातील शहर कोतवाली पोलीस ठाण्यात परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध २२ कलमान्वये बुधवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team Global News Marathi: