विचारांची नग्नता ; वाचा सविस्तर-

कालपासून रणबीर सिंगचा नग्न फोटो अनेक समाजमाध्यमांतून चेष्टेने फिरतोय. त्याला मीम तसेच पोस्टच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ट्रोलिंग होतेय, जेवढं हे फोफावेल तेवढं रणबीर सिंगचं मॉडेलिंग बजेट वाढेल. काही काळापूर्वी मिलिंद सोमण असाच चर्चेत आला होता. त्याआधी वनिता खरात ही बिनधास्त मॉडेल या प्लॅटफॉर्मवर काम करून गेली. आज व्यवहारी जगात हे नग्न होणं आपल्याला कुतुहलाचं असलं तरी कुणालाही ते गैर वाटणार नाही.

हा त्यावर आपण विनोदी आक्षेप घेऊन एक ब्लॅक कॉमेडी नक्कीच निर्माण करतोय. पण त्यातूनही कुण्या एका मॉडेलिंग कंपनीचा गल्ला रग्गड भरला जाणार आहे हे आपल्याला ज्ञात असावे. क्लासी गोष्टींचा विचार केला तर भारतातील पुरातन विभागाच्या अनेक खात्यात, सांस्कृतिक विभागात अनेक नग्न कलाकृती दिसून येतात. त्याला अभिजात कलेचा दर्जा देत आपण त्यांचा अभ्यास देखील करतोय!

याच निमित्ताने बराच मोठा ऐतिहासिक पट डोळ्यांसमोर आणताना मला काल आठवले ते “र. धो. कर्वे” संपादित “समाजस्वास्थ्य” या मासिकाचे मुखपृष्ठ! एका नग्न स्त्रीचे हे रेखाचित्र! “सत्य हे नेहमी नग्न असतं” हा र.धो.कर्वे यांचा विचार त्यांच्या मासिकाच्या या मुखपृष्ठातून त्यांनी समर्थपणे अधोरेखित केला. १९२९ च्या काळात भारतीय समाजाच्या स्वास्थ्याचा विचार करून त्यांनी जी स्त्रियांचे आरोग्य जपण्याची गरज व्यक्त केली, त्याला तत्कालीन समाजाने भयंकर विरोध केला होता.

समाजाने कर्वे कुटुंबाला अक्षरशः वाळीत टाकलं होतं. नग्नतेचा बाजार मांडणारे मासिक म्हणून ‘समाजस्वास्थ्य’ची अवहेलना झाली होती. तरीही कर्वे थांबले नाहीत. अनेक कुटुंबांसोबतच अगदी वेश्याव्यवसाय करणाऱ्या गल्ली बोळापर्यंत कर्वेनी जनजागृती केली. अश्लील आणि अश्लाघ्य विचार मांडणारे मासिक हा गैरसमज समाजात इतका पसरलेला होता की, या अंकासाठी त्यांना आर्थिक पाठबळ देखील फार काही मिळालं नाही. आश्चर्य म्हणजे आज अशाच नग्न झालेल्या गोष्टी करोडोंत विकल्या जातात.

प्रसंगी पदरमोड करून कर्वे दाम्पत्याने हे काम सातत्याने सुरूच ठेवलं. भारतीय समाजस्वास्थ्यासाठी संततीनियमन होणे ही काळाची गरज आहे हे दाखवून देणारे मोलाचे कार्य श्री व सौ र.धो. कर्वे या दाम्पत्याने त्याकाळी अतिशय संयमाने पार पाडले आणि त्याची फार मोठी किंमतही चुकवली.

आज अनेक रुग्णालयात “हम दो और हमारे दो” अशी जी सूचना दिसते त्याचे उद्गाते खऱ्या अर्थाने “र.धो.कर्वे” हेच होतील. पण दुःख या गोष्टीचं आहे की आजही आपल्या समाजात याबद्दल फार जागृती झालेली नाहीये. परिस्थिती अशी आहे की नग्न फोटो आपण सहज स्वीकारू, पण नग्न विचार स्वीकारणे एवढे सोपे नाही. त्यामुळे बाबांनों कान, नाक, डोळे याहीपेक्षा मेंदूतील विचार उघडे ठेवणं ही काळाची गरज आहे.

ते शिका! अनादी काळापासून नग्न विचार म्हणून आपण सत्य झाकत आलोय आणि नग्न फोटो मात्र चोरून बघितलेत. आज तेच नग्न फोटो चोरून नव्हे तर बेधडक पोस्ट करतोय. त्याची किंमत वाढवून आपलेच खिसे रिकामे करतोय. त्याऐवजी कुणी नग्न सत्य मांडलं की, ते मात्र आपण बेधडक स्वीकारू शकत नाही कारण तेच की, खरी नग्नता बोचते. ती स्वीकारली तर विशिष्ट एका वर्गाची वर्चस्व वृत्ती धोक्यात येईल, दांभिकता उघडी पडेल. तीच दांभिकता र. धो. कर्वे यांनी समाजस्वास्थ्य मधून सत्य मांडून उघडी पाडली होती!

र.धो.कर्वे तुम्हाला माहित नसतील तर, कालच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आपले लाडके कवी/अभिनेते “किशोर कदम” (सौमित्र) यांची प्रमुख भूमिका असणारा, अमोल पालेकर दिग्दर्शित “ध्यासपर्व” हा चित्रपट नक्की बघा!

‘सत्य नग्न असतं, पण नग्न करण्यात आलेली प्रत्येक गोष्ट सत्य असेलच असं नाही.’ नग्नतेच्या या ढोबळ सोशल चौकटी मोडीत काढण्याची गरज येऊन ठेपलीय!

© ज्योती हनुमंत भारती.
पूर्व प्रसिध्दी: दैनिक संचार (इंद्रधनु)
२४ जुलै, २०२२.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: