आता गृहमंत्री पदाची जबाबदारी राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याकडे जाणार

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांची सीबीआयने चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे.

अनिल देशमुख आपला राजीनामा घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे रवाना झाले असून गृहमंत्री पदाची जबाबदारी ही सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती दिली.

आता रिक्त झालेल्या गृहमंत्री पदावर राष्ट्रवादी पक्षाच्या कोणत्या नेत्याची वर्णी लागणार अशी चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे. तर देशमुखांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्रीपद राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचे नाव पुढे येत आहे.

दरम्यान, मुंबई हायकोर्टानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावतीने अनिल देशमुख यांच्याविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात ३१ मार्चला युक्तिवाद झाला.

परमबीर सिंग यांच्यावतीनं वकील विक्रम ननकानी यांनी बाजू मांडली. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. अड. जयश्री पाटील यांनी देखील अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.

Team Global News Marathi: