निवडणुकांबाबत गाफील राहू नका; राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

 

मुंबई : ओबीसी आरक्षणावरून महापालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका लांबल्याचे सध्या दिसत असले तरी, त्याबाबत गाफील राहू नका. महापालिका निवडणुका कधीही लागू शकतात असे सांगत, त्यासाठी सज्ज राहा, असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती तिथीप्रमाणे जल्लोषात साजरी करण्याचे निर्देश देत, पाडव्याच्या मेळाव्यानंतर राज्यभर दौरा करणार असल्याचा संदेशही ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारने मध्य प्रदेश पॅटर्नचा कायदा करीत, महापालिकांच्या निवडणुका सहा महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकांसह जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, राज यांनी मुंबई, नवीमुंबई, पुणे, नाशिक, नागपूर येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांची सोमवारी मुंबईत बैठक बोलावली होती.

राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकीबाबत गाफील न राहण्याचा सल्ला दिला. ओबीसी आरक्षणावरून आघाडी सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असला तरी, त्यावरून सध्या संभ्रम सुरू आहे. राज्य सरकारच्या कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान दिल्यास तो टिकणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे एकीकडे निवडणुका लांबल्या अशी चर्चा असली तरी, त्यावर विश्वास ठेवू नका. निवडणुका कधीही होऊ शकतात. त्यासाठीची तयारी सुरूच ठेवा, असा संदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला

Team Global News Marathi: