मुंबई | पाकिस्तान, बांगलादेशातील हिंदूना त्रास साहहन करावा लागत असताना दुसऱ्या बाजूच्या अफगाणिस्तानातही तालिबान्यांनी हिंदू व शीख समाजावर निर्घृण हल्ले सुरू केले आहेत. मंदिरे, गुरुद्वारात घुसून विध्वंस केला जात आहे. याची फक्त दखल घेऊन किंवा निषेध करुनच भागणार नाही, तर शेजारी राष्ट्रांतील हिंदू-शिखांना आधार वाटेल असा एखादा दणका देणे गरजेचे आहे. मोदी-शहाजी आपल्या मजबूत इराद्यांची जगभरात चर्चा आहे. भाईबंदांच्या रक्षणासाठी कठोर पावलं उचला, अशी विनंती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केली आहे.
तिन्ही राष्ट्रांतले हिंदू तेथे परंपरेने, पिढ्यान् पिढ्या राहात आहेत. ते आक्रमक नाहीत व अतिरेकी नाहीत. त्यांच्या मागण्याही नाहीत, पण शेजारच्या तिन्ही राष्ट्रांतील धर्मांध अतिरेकी त्यांना समूळ खतम करू पाहत आहेत. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांनी हिंदूंची ही पिछेहाट व दुर्दशा थांबवावी. आपल्या मजबूत इराद्यांची जगभरात चर्चा आहे. म्हणूनच शेजार राष्ट्रांतील आपल्या भाईबंदांच्या रक्षणासाठी कठोर पावले उचलावीत, अशी विनंती अग्रलेखातून करण्यात आली आहे.
मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हा एक मजबूत देश बनला आहे, असा दावा भाजपातील कडवट मोदीभक्त नेहमीच करीत असतात. त्यात काहीच चुकीचे नाही. मोदी यांच्या ‘शक्तिमान’ प्रतिमेमुळे तसेच गृहमंत्री शहा यांच्या ‘बाहुबली’ कार्यपद्धतीमुळे देशातील व देशाबाहेरील अतिरेकी प्रवृत्ती भारताला टरकून असल्याचेही सांगितले जाते, पण गेल्या काही दिवसांत शेजारी राष्ट्रांत तसेच जम्मू-कश्मीर खोऱ्यात हिंदू आणि शिखांवरील हल्ले वाढले आहेत. त्यांच्याकडे फक्त हिंदू किंवा शीख म्हणून न पाहता आपल्या रक्ताची माणसे म्हणून पाहायला हवे. कश्मीरात अतिरेकी कारवायांनी पुन्हा फणा काढला आहे.
भारतीय जनता पक्षाचे एक सरपंच व त्यांच्या पत्नीची अतिरेक्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. अनंतनागमधील घरात घुसून गुलाम रसुल दार व पत्नी जव्हारा बेगम यांना ठार केले. हो दोघेही राष्ट्रवादी मुस्लिम होते व त्यांच्या घरावर तिरंगा फडकत होता. गेल्या काही महिन्यांपासून खोऱ्यात भाजपसंबंधित लोकांवर हल्ले वाढले आहेत व ही खरोखरच चिंतेची बाब आहे असे आजच्या अग्रलेखात म्हंटले आहे.