एनसीबीची कोठी कारवाई मुंबईत पकडले चार कोटीचे ड्रग्स

 

राज्यात एकीकडे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याच्या अडचणी अधिक वादात असताना दुसरीकडे मात्र नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी मुंबई झोनल युनिटने आज मोठी कारवाई केली आहे. मुंबई विमानतळ परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई विमानतळाच्या कार्गो कॉम्प्लेक्समधून तब्बल चार कोटीचे ड्रग्स ताब्यात घेतले.

एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटने मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली. सहार इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनलवर पार्सलद्वारे अमली पदार्थ येणार असल्याची माहिती होती. त्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून संशयित वस्तूंची तपासणी सुरू केली. या तपासणीत कार्गो कॉम्प्लेक्समधील कॉन्फरन्स हॉलमधील एका पार्सलमध्ये संशयित पावडर आढळली. जवळपास ७०० ग्रॅमची ही हेरॉइन असून त्याची किंमत अंदाजित चार कोटी रुपये आहे.

एनसीबीने या प्रकरणी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे पार्सल वडोदरामधील एका व्यक्तीचे असल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीला चौकशीनंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या प्रकरणी एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा अधिक तपास सुरू आहे. मागील काही दिवसांपासून एनसीबीचे मुंबई झोनल युनिट चर्चेत आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून एनसीबीच्या कारवाईवर राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले होते. मलिक यांच्या आरोपामुळे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Team Global News Marathi: