मोदी सरकारच्या ‘दिवाळी गिफ्ट’वरून शिवसेनेचं टीकास्त्र

 

मुंबई | देशात काही ठिकाणी पेट्रोलचे दर १२० रूपयांच्या पुढे गेले होते. तर डिझेलचे दरही १०० रूपयांच्या पुढे गेले होते. परंतु दिवाळीच्या तोंडावर सरकारनं देशवासीयांना दिलासा देत उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याच दरम्यान मोदी सरकारच्या दिवाळी गिफ्ट’वरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून जोरदार हल्लबोल चढवण्यात आलेला आहे. “इंधन स्वस्ताईचा देखावा, पोटनिवडणुकीत पराभवाचे फटके बसले म्हणून सरकारला आली जाग” असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच “आवाक्याबाहेरील इंधन दरवाढ आणि महागाईने जनतेचे जे आजवर नुकसान झाले आहे त्याचे काय?” असा सवालही केला आहे.

सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. “तेरा राज्यांतील पोटनिवडणुकांत मतदारांनी ‘आरसा’ दाखविला नसता तर कदाचित केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी स्वतःला त्या आरशात पाहण्याची तसदीही घेतली नसती. ठीक आहे. पोटनिवडणुकांतील पराभवाच्या धक्क्याने का होईना, केंद्र सरकारला जाग आली आणि त्यांनी इंधन स्वस्ताईचा देखावा केला, हेही नसे थोडके. अर्थात, या देखाव्याची जनतेला भुरळ पडेल आणि पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकीत ‘मत’ परिवर्तन होईल, अशी सरकार पक्षाची अपेक्षा असेल तर त्यांचा हा भ्रमाचा भोपळाही या पोटनिवडणुकीप्रमाणे फुटणार, हे निश्चित आहे” असं अग्रलेखात म्हटलं आहे.

केंद्र सरकारने अखेर पेट्रोल – डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारचे हे सर्वसामान्यांना ‘दिवाळी गिफ्ट ‘ वगैरे आहे, असे ढोल आता सत्ताधारी मंडळी पिटत आहेत. तेरा राज्यांतील लोकसभा – विधानसभा पोटनिवडणुकांत भारतीय जनता पक्षाचे ढोल मतदारांनी फोडले असले तरी त्यांचे ढोल पिटण्याची हौस काही कमी झालेली नाही. वस्तुस्थिती ही आहे की, या पोटनिवडणुकांतील पराभवामुळेच केंद्रातील सरकारला हे ‘शहाणपण’ आले आहे. सरकारला इंधन स्वस्ताईची दिवाळी गिफ्टच द्यायची होती तर हा निर्णय दिवाळीच्या पूर्वसंध्येला किंवा त्यापूर्वी का घेतला नाही? पोटनिवडणुकीत पराभवाचे फटके आणि झटके बसले म्हणून सरकारला जाग आली. भयंकर इंधन दरवाढीचे जे चटके सामान्य जनता सहन करीत आहे त्याची झळ भाजपला बसली. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घाईघाईने घेण्यात आला आणि त्यावर ‘ दिवाळी गिफ्ट ‘ चा मुलामा चढविला गेला.

पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी, तर डिझेलवरील १० रुपयांनी कमी करण्यात आले आहे. अर्थात तरीही पेट्रोल – डिझेल प्रतिलिटर शंभरीपारच असणार आहे . तेव्हा केंद्राने काही प्रमाणात जनतेला दिलासा दिला हे खरे असले तरी ही काही ‘दिवाळी गिफ्ट’ वगैरे म्हणता येणार नाही. शिवाय इंधनाचे दर खूप खाली घसरले आहेत असे नाही. त्यामुळे महागाईचा वणवा विझेल अशी अपेक्षा करता येणार नाही. म्हणजे पेट्रोल – डिझेलवरील खर्च किंचित कमी होईल, पण सर्वसामान्यांचा रिकामा झालेला खिसा भरला, असे अजिबात होणार नाही. मुळात केंद्राला जर खरंच ‘ दिवाळी गिफ्ट ‘ द्यायचे होते तर मग सामान्य जनतेचा रिकामा झालेला खिसा कसा भरेल, विझलेल्या चुली कशा पेटतील अशा पद्धतीने इंधन स्वस्त करायला हवे होते. मात्र तेवढी इच्छाशक्ती केंद्र सरकारने दाखविलेली नाही. दिले, पण हात आखडता ठेवून दिले’ असेच या इंधन दरकपातीबाबत म्हणता येईल.

Team Global News Marathi: