नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी बाणा’ मुख्यमंत्री दाखवणार का ?

 

बॉम्बस्फोट करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या नवाब मलिक यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रीपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान असून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून ठाकरी बाणा दाखवणार का, असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. अनिल देशमुख यांचा जसा तातडीने राजीनामा घेण्यात आला तोच न्याय मलिक यांना लावला पाहिजे. दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप हा देशद्रोहाएवढाच गंभीर असल्याने असा ठपका असलेला मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात असणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे, असे ते म्हणाले.

मुंबई महापालिकेसह अन्य निवडणुकांवर डोळा ठेवून मुस्लिमांच्या अनुनयाकरिता देशद्रोही दाऊदच्या हस्तकास अभय देण्याचे हीन राजकारण ठाकरे सरकारच्या अधोगतीस कारणीभूत ठरेल असा इशाराही श्री.उपाध्ये यांनी दिला. नवाब मलिक यांनी दाऊदच्या दहशतवादी कारवायांकरिता पैसा जमा करण्याच्या कटास साह्य केल्याचा आरोप असून त्यासाठीचे सज्जड पुरावे ‘ईडी’कडे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ज्या दाऊद इब्राहीमने १९९२ मध्ये मुंबईत भीषण बॉम्बस्फोट घडवून शेकडो निरपराध नागरिकांचे बळी घेत देशाविरुद्धचा सर्वात घातक दहशतवादी कट आखला, त्याच दाऊदशी नवाब मलिक यांची हातमिळवणी असल्याचा गंभीर आरोप ईडीकडून करण्यात येत असतानाही मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यास विरोध करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लांगूलचनाच्या राजकारणाची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागेल. अशा देशद्रोही कारवायाना मदत केल्याचे पुरेसे पुरावे ईडीकडे असल्याचे सांगण्यात येत असतानाही मलिक यांना मंत्रिपदावर ठेवण्याच्या दबावापुढे झुकून मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपण कणाहीन राजकारणी असल्याचे सिद्ध केले आहे, अशी टीकाही उपाध्ये यांनी केली.

१९९२-९३ च्या बॉम्बस्फोटात दाऊदच्या हल्ल्यापासून मुंबईकरांचे संरक्षण करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचे वारस आज मात्र, मुख्यमंत्रीपद आणि सत्तेच्या हव्यासापोटी दहशतवादी दाऊदच्या हस्तकास वाचविण्याचा घातक खेळ करत आहे, असा आरोप करून, ठाकरे यांच्या कणाहीन राजकारणामुळे महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेस धोका निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Team Global News Marathi: