नवाब मलिकांच्या जामिनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामिनावरआज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यांना जेल की बेल याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळं न्यायलयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिकांवर गेल्या काही महिन्यांपासून कुर्ल्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वी मलिकांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला होता. त्यामुळं त्यांना आता दिलासा मिळणार की, त्यांच्या अडचणीत अजून वाढ होणार हे पाहावं लागणार आहे.

नवाब मलिक यांना ईडीनं गोवावाला कंपाऊंडमधील जमीन खरेदीच्या व्यवहारात केलेल्या मनी लॉड्रिंग प्रकरणी अटक केली होती. दाऊद इब्राहिमच्या टोळीसोबत केलेल्या व्यवहारातून दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याचा आरोपही मलिकांवर करण्यात आला आहे. त्यांच्या जामीनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सकाळी 11 वाजता सुनावणी सुरु होणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना देखील जामीन मिळाला आणि ते तुरूंगाबाहेर आले आहेत. आता नवाब मलिक यांना दिलासा मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. या महिलेने 1999 मध्ये सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी जारी केली होती. याद्वारे सलीम पटेलकडून या जमिनीवर असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत तोडगा काढणे अपेक्षित होते.

मात्र, पटेलने याचा दुरुपयोग करत हसीना पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कंपाउंडमधील जमीन मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे. मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली असल्याचा ईडीचा आरोप आहे. तर, नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Team Global News Marathi: