माझ्या विधानाचा प्रबोधनकारांच्या पुस्तकांचा संबंध काय? – राज ठाकरे

 

पुणे | मी प्रबोधनकार ठाकरे वाचलेत आणि मी यशवंतराव चव्हाणही वाचलेत; परंतु जातीयवाद विषयावर मी जे मत मांडले त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकाशी काय संबंध, हे मला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी समजावून सांगावे, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत लगावला. तसेच पवार यांच्या टीकेला उत्तर देत पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर टीका केली.

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला, असे विधान काही दिवसांपूर्वी ठाकरे यांनी केले होते. त्यावर ठाकरे यांनी त्यांच्या आजोबांचे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे असा सल्ला पवार यांनी दिला होता. त्याला ठाकरे यांनी उत्तर दिले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर गेल्या ७५ वर्षांत आपण काय कमावले आणि गमावले याविषयावर मी मत मांडत होतो. किती दिवस रस्ते, पाणी, वीज देऊ अशा घोषणा आपण करत राहणार आहोत. जातीपातीचे राजकारण सोडून जोपर्यंत आपण वैचारिकदृष्ट्या प्रगत होत नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही.

या आधीही जात-पात होतीच परंतु जातीय द्वेष जो वाढला, तो राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जन्मानंतर वाढला, असे मी म्हणालो होतो, असे ठाकरे म्हणाले. भाजप सरकारने हिंदुत्त्ववादाचे राजकारण केले, ते धर्माचे किंवा जातीचे राजकारण नाही का, असे विचारले असता, ‘त्यांच्याकडे आधीपासूनच हिंदुत्त्वाचे राजकारण आहे ना, त्यामुळे वातावरण असणे आणि ते निर्माण केले जाणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत’, असे उत्तर ठाकरे यांनी दिले.

Team Global News Marathi: