मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या

 

मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि दक्षिण मुंबईतील अनेक चाळींचं रिडेव्हलपमेंट करणारे प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांनी आज आत्महत्या केली आहे. भायखळा येथील राहत्या इमारतीच्या 23व्या मजल्यावरुन उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली. सकाळी 6 ते 7 वाजताच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पारस पोरवाल यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात मुंबईतील दादर इथल्या सुविधा या प्रसिद्ध शोरुमचे संचालक कल्पेश मारु (वय 46 वर्षे) यांनी आत्महत्या केली होती.

कल्पेश मारु यांचा मृतदेह विरार इथे आढळून आला होता. कल्पेश मारु हे 15 ऑगस्टपासून बेपत्ता होते. त्याबद्दल दादर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. 18 ऑगस्ट रोजी विरारजवळील शिरसाड फाट्याजवळ पोलिसांना त्याचा मृतदेह आढळला. त्याच्याजवळ असलेल्या कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटली. कल्पेश हे सुविधा दुकानाचे मालक शांतीलाल मारु यांचे पुत्र होते.

Team Global News Marathi: