मुंबईत शिवसेनेसोबत जाण्याची इच्छा, अजित पवारांचे मुंबई मनपा निवडणुकीवरून मोठे विधान

 

मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची ताकद आहे हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे याअगोदरच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्हाला बरोबर घ्या अशी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले.शिवसेना-वंचित युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्नच येत नाही. कुणाला मित्रपक्ष म्हणून घ्यायचे व त्यांच्या कोट्यातून घ्यायचे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे, असेही ते म्हणाले.

पुण्यातील चिंचवड आणि कसबा या दोन्ही मतदारसंघातील जागांसंदर्भात पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली. आघाडी म्हणून शिवसेना, काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे. याशिवाय जे घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन या निवडणुका लढवल्या जाव्यात ही भूमिका असून याबाबत अंतिम निर्णय झाल्यावर माध्यमांना सांगितला जाईल, असेही अजित पवार म्हणाले.

राजकारणात येणार्‍या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यानुसार आराखडे आखावे लागतात व राजकीय भूमिका मांडावी लागते. यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ‘मातोश्री’ निवासस्थानी आज रात्री बैठक होणार आहे, असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. यावर आता विरोधक काय प्रतिक्रया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: