शिंदे गटाच्या आमदाराची महाविद्यालयातील प्राचार्याला मारहाण

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील आमदार संतोष बांगर यांना समज देऊन देखील त्यांचा आक्रमकपणा कायम आहे. बांगर यांनी यापूर्वी अधिकारी, पदाधिकारी यांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत, आता त्यांनी एका प्राचार्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

माहितीनुसार, डॉ. अशोक उपाध्याय असे या प्राचार्यांचे नाव आहे. बांगर यांनी सर्वांसमोर या प्राचार्यांचे कान पकडले आणि त्यांना मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हिंगोलीच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. हे प्राचार्य एका प्राध्यापिकेला त्रास देत असल्याची तक्रार बांगर यांच्याकडे आली होती. याचा जाब विचारण्यासाठी बांगर हे डॉ. उपाध्यक्ष यांच्याकडे आले होते.

सध्या हा मारहाणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. बांगर यांनी केलेल्या या प्रकारामुळे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर पुन्हा एकदा टीका करण्यात येत आहे. यापूर्वी सुद्धा आमदार संतोष बांगर यांच्यावर अनेक आरोप लागण्यात आले होते. मध्यान्ह भोजनामध्ये दिल्या जाणाऱ्या वरणात अळ्या सापडल्या होत्या तेव्हा त्यांनी उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती.तसेच ऑक्टोबरमध्ये कृषी विभागाच्या कार्यालयात राडा घातला होता. त्यांनी शेतकऱ्यांसह पिकविमा कार्यालयाची तोडफोड केली होती.

Team Global News Marathi: