मुंबईत हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट; वर्तवली जोरदार पावसाची शक्यता

 

मुंबई | हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये आज मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शहर आणि उपनगरात मध्यम स्वरुपाच्या पावसासह आकाश ढगाळ राहील. काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट जारी केल्याची माहिती हवामान विभागाने आपल्या दैनंदिन बुलेटिनमध्ये दिली आहे. ऑरेंज अलर्ट असल्याने नागरिक आणि प्रशासनाने सावध राहणे आवश्यक आहे.

तसेच येत्या दोन किंवा तीन दिवसांत शहरात सुमारे 130 मिमी पाऊस पडू शकतो, जो मुंबईच्या मानकांनुसार चिंताजनक नाही, परंतु त्यामुळे पाणी साचू शकते, असे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई आणि उपनगरातील बहुतांश भागात आठवड्याच्या शेवटीही हलक्या सरी बरसल्या. इतर उपनगरांच्या तुलनेत दक्षिण मुंबईत अधिक पाऊस झाला आहे. गेल्या आठवड्यात मान्सून हलक्यात गेला असला तरी या आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहिले असून मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात अधूनमधून पाऊस पडत आहे.

मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये नैऋत्य मान्सूनचे आगमन होऊन एक आठवडा उलटून गेला असताना, या कालावधीतील बहुतांश भागात पाऊस कमी झाला आहे. पावसामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता ‘चांगली’ श्रेणीत आहे. तसेच भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस किंवा 22 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Team Global News Marathi: