मुंबईत मागच्या काही दिवसांपासून आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून आता मुंबईतील ताडदेव भागात एका इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ताडदेव परिसरात असलेल्या कमला या इमारतीला ही आग लागली आहे. ही रहिवाशी इमारत असून २० मजली इमारत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. इमारतीच्या १८व्या मजल्यावर ही आग लागली आहे.
सदर इमारतीला लागलेल्या आगीत १५ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शेजारील भाटीया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
तसेच अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ताडदेव परिसरात असलेल्या भाटीया रुग्णालयाच्या जवळील कमला या बहुमजली इमारतीला ही आग लागली आहे. सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.