मुंबई मनपा प्रशासक | शिवसेनेच्या ‘या’ योजनेऐवजी लागू होणार केंद्राची योजना

 

मुंबई | मुंबई महापालिकेत प्रशासक लागू झाल्यानंतर आता शिवसेनेच्या योजनेऐवजी केराच्या योजना लागू केल्या आहेत. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण योजना म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टींग योजना २००७ मध्ये शिवसेनेनं मुंबईत सुरु केली होती. मात्र ही योजना अपयशी ठरल्यानंतर आता बीएमसी प्रशासनानं केंद्र सरकारच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेलं ‘कॅच दि रेन’ अभियान सुरु करायचं ठरवलं आहे.

मुंबईमध्ये काही वर्षांपूर्वी सातत्यानं कमी पावसामुळं पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागले होते. त्यासाठी शिवसेनेनं 2007 मध्ये मुंबईत ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ही योजना राबविण्यात पालिका प्रशासनाला अपयश आले. मुंबईमध्ये नवीन बांधकाम होणाऱ्या इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं बंधनकारक केलं होतं.

मात्र, गेल्या १५ वर्षात रेन वॉटर हार्वेस्टिंगची योग्य प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही. ही योजना राबवण्यासाठी माजी महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना आपल्या विभागात तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, परदेशी यांच्यानंतर दोन पालिका आयुक्त बदलले तरीही हा अहवाल अद्याप समोर आलेला नाही.

२०१२ मध्ये तत्कालीन माहापौर सुनिल प्रभू यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत श्वेतपत्रिका काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. गेल्या 10 वर्षातही श्वेतपत्रिकाही समोर आलेली नाही. मुंबईमधील १२०० उद्यानांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. उद्यानांमध्येही ही संकल्पना पालिकेला राबवता आलेली नाही.

Team Global News Marathi: