मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवरून ठाकरे गटाची सामना अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

 

राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना (ठाकरे गट) संजय राऊत यांनी एक वाक्य करून चर्चांची सुरुवात केली आहे, त्यातच आता सामानाच्या अग्रलेखातून याच मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाण साधला आहे. राज्याच्या राजकारणात भलताच खेळखंडोबा सध्या सुरू आहे. राज्यात सरकार नावाची चीज अस्तित्त्वात नाही पण राज्याला मुख्यमंत्री आहेत की नाही? असा प्रश्न पडला आहे. तसंच हे मुख्यमंत्री लवकरच जाणार आणि त्यांच्या जागी कुणाला बसवलं जाणार हे आता बघायचं आहे असे अग्रलेखात म्हटले गेले आहे.

राज्याला मुख्यमंत्री आहेत का? हा प्रश्नच आहे. मुख्यमंत्रीपदावर रोज चर्चा झडत आहेत. मुख्यमंत्रीपद रिकामं नाही हे खरं आहे पण रिकामपणाचे उद्योग जोर धरू लागले आहेत. एका कार्यक्रमात अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाविषयी प्रश्न विचारला गेला ते म्हणाले २०२४ काय आत्ताच मुख्यमंत्री व्हायला आवडेल. मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल हे सांगणं गैर नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांनाही कधीपासून मुख्यमंत्री व्हायचे आहे.

विखे यांना अजित पवारांविषयी विचारलं असता त्यांचा सूर वेगळाच होता. आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असं सांगून त्यांनी शिंदे-मिंधे गटाचे कपडे उतरवले. वि. खे. पाटील यांच्यापुढे १०० पावलं फडणवीस गेले आणि हळूच म्हणाले मुख्यमंत्रीपदाचे काय कोणीही इच्छा बाळगू शकतो पण योग्यता हवी ना? फडणवीस यांनी हे वक्तव्य हसत केलं मात्र त्यात वैफल्य आणि त्रागा असल्याचे अग्रलेखात म्हटले गेले आहे.

पुढे लेखात देवेंद्र फडणवीस यांचा हा त्रागा सवती मत्सराचा आहे. भर मंडपात वरमाला तयार असताना अचानक बोहल्यावर मिंध्यांना चढवून फडणवीसांच्या बाबतीत जे घडवले गेले त्यातून ते अद्याप सावरलेले दिसत नाहीत. मुख्यमंत्रीपदासाठी कधी विखे पाटील यांचे तर कधी अजित पवारांचे नाव चर्चेत आणले जाते आहे. या दुःखाने बेजार झालेले फडणवीस हे सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशा परमोच्च अवस्थेला पोहचले आहेत. ही अवस्था म्हणजे बेधुंद नशेचे शेवटचे टोक आहे, असे म्हटले गेले आहे.

सध्याच्या राजकारणात कुणीही कोणाला डोळा मारतो हे अमृतावहिनींनी सांगितले. अहो पण हा काय संसार झाला? या सगळ्याबाबत मिंधे गटाचे गोगावले सांगतात आमच्या मनात मिंधेच. तशी दिल्लीची कमिटमेंट आहे. श्रीमान गोगावले असंही म्हणाले की अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. ते त्यांना शक्य नाही. अजित पवारांना काय व्हायचे आणि काय नाही हे ठरवणारा मिंधे गट कोण? गोगावले हे पवारांचे वकील आहेत का? सध्याचे मुख्यमंत्री विसर्जित होणार हे नक्की. फक्त आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवणार ते पाहायचे. महाराष्ट्राच्या राजकारणात इतका गोंधळ आणि अराजक कधीही माजले नव्हते, असे देखील लेखात म्हटले गेले आहे.

Team Global News Marathi: