वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स ने घेतली खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्याची दखल, कोरोनाकाळात धारावीत केलेल्या कार्याचा लंडनच्या संस्थेकडून गौरव

 

मुंबई | दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांच्या कोरोनाकाळातील कार्याची दखल लंडनच्या ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतली आहे. कोरोनाला हद्दपार करणारा धारावी पॅटर्न राबविण्यात विशेष योगदान दिल्याबद्दल ‘सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट’ या सन्मानपत्राने त्यांना गौरविण्यात आले. वर्ल्ड रेकॉर्ड बुकचे डॉ. दीपक हरके यांनी मुंबईत खासदार शेवाळे यांना हे सन्मानपत्र बहाल केले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचं मोठं आव्हान सरकारी यंत्रणेसमोर होतं. माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खासदार राहुल शेवाळे यांनी राज्य सरकार, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, सरकारी आणि खासगी डॉक्टर्स, सेवाभावी संस्था आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सहाय्याने कोरोना नियंत्रणाचा ‘धारावी पॅटर्न’ यशस्वी करून दाखविला. या धारावी पॅटर्नची दखल आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीदेखील घेतली होती. धारावी पॅटर्न यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल खासदार शेवाळे यांना ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या आंतरराष्ट्रीय सन्मानाने गौरविण्यात आले.

या संदर्भात बोलताना खासदार शेवाळे म्हणाले की, “धारावी पॅटर्न यशस्वी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. प्रतिकूल परिस्थितीत, सरकारी नियमांचे पालन करत एकजुटीने कोरोनवर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी ठरलेल्या धारावीतील जनतेला हा सन्मान मी अर्पण करतो”

Team Global News Marathi: