मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडणे ही शरमेची बाब माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे टीकास्त्र

 

ज्या मंत्रालयातून राज्य कारभार चालविण्याची शपथ घेतली जाते त्या मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडणे ही राज्यकर्त्यांसाठी अत्यंत शरमेची बाब आहे. राज्य सरकारचे एकूण धोरण पाहता आघाडी सरकारला महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र बनविण्याची घाई झालेली आहे, अशी टीका भाजपा नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी केली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. महेश बालदी आणि गणेश हाके यावेळी उपस्थित होते.

मुनगंटीवार म्हणाले की, आघाडी सरकारने मागील आर्थिक वर्षांत मद्य विक्रेत्यांचे परवाना शुल्क माफ केले. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली. आता किराणा दुकानात बिअर आणि वाईन विक्रीला परवानगी देण्याचा विचार आघाडी सरकार करत आहे. मद्य घेणारे आणि मद्य विक्रेते यांच्या आधारावरच राज्याची अर्थव्यवस्था टिकून आहे असा समज आघाडी सरकारने करून घेतल्याचे दिसत आहे. राज्य सरकारचे धोरण पाहून मद्य विक्रेत्यांकडून मिळकत कर माफ करण्याची मागणी होऊ लागली आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनविण्याच्या दिशेने आघाडी सरकारची वाटचाल सुरु आहे असे दिसते आहे.

मंत्रालयात मद्याच्या बाटल्या सापडल्याने आघाडी सरकारची नाचक्की झाली आहे. ज्या मंत्रालयातून राज्यकारभार चालविण्याची शपथ घेतली जाते त्याच मंत्रालयात असा बेधुंद कारभार सुरु असणे ही आघाडी सरकारच्या दृष्टीने अत्यंत शरमेची बाब आहे, असेही मुनगंटीवार यांनी नमूद केले.

Team Global News Marathi: