आयकॉनिक एअर इंडियाच्या इमारतीच्या खरेदीबाबत राज्य सरकारचा रस !

 

मुंबई | राज्य सरकारने नरिमन पॉईंटवरील आयकॉनिक एअर इंडियाच्या इमारतीच्या खरेदीबाबत पुन्हा एकदा एक पाऊल पुढे टाकले आहे. आघाडी सरकार ही इमारतही १४०० कोटी रुपयांना विकत घेण्यास इच्छुक असून एअर इंडियाने मात्र इमारतीची किंमत २ हजार कोटी रुपये असल्याचं बैठकीत सांगितलं आहे.

एअर इंडियाची इमारत ज्या जमिनीवर उभी आहे ती जमीन राज्य सरकारच्या मालकीची आहे. आणि एअर इंडियाने खर्च म्हणून राज्य सरकारला ४०० कोटी रुपये देणं आहे. त्यामुळे या संपूर्ण करारावर २४०० कोटी रुपये खर्च होतील. एअर इंडियाला जर इमारतीच्या विक्रीची प्रक्रिया पुढे न्यायची असेल तर त्यांनी मूल्यांकनाची प्रत द्यावी, असे राज्य सरकारने सांगितले आहे.”

त्यातच इमारतीच्या प्रस्तावीत विक्रीबाबत एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली असल्याचं सीताराम कुंटे यांनी कबूल केलं. तसेच आम्ही विविध कायदेशीर आणि मूल्यांकनासंबंधीत बाबींची तपासणी करत आहोत, असं ते म्हणाले. तर, एअर इंडियाचे सीएमडी बन्सल यांनी ही अंतर्गत बैठक असल्याचे सांगून प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

२०१८ मध्ये एअर इंडियाला तोटा झाल्यानंतर त्यांनी जमीन आणि इमारतीतील भाडेपट्टीचे हक्क विकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत विखुरलेली कार्यालये एका इमारतीत आणण्यासाठी ही इमारत खरेदी करण्यात रस दाखवला होता. या २३ मजली इमारतीसाठी राज्य सरकारने १४०० कोटी रुपयांची बोली लावली होती. ही रक्कम इमारतीच्या राखीव किमतीपेक्षा २०० कोटी रुपयांनी कमी आहे.

Team Global News Marathi: