“माझ्या विरोधात कितीही खोट्या तक्रारी करा, पण…”, राऊतांचे सूचक विधान

 

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांविरोधात अब्रुनुकसानीची तक्रार करण्यासाठी भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आणि कुटुंबीय मुलुंडमधील पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. याबाबत आता संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सोमय्यांवर जोरदार टीका केली.

माझ्याविरोधात कितीही खोट्या तक्रारी करा पण आगामी काळात विक्रांत आणि टॉयलेट घोटाळ्यापेक्षा मोठे घोटाळे समोर येणार आहेत, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

“विक्रांत घोटाळ्यातील एक आरोपी जर कुठे जाऊन खोट्या तक्रारी करत असेल तर तसं करायला हरकत नाही. युवक प्रतिष्ठानच्या नावे जो घोटाळा होत आहे त्यात कोट्यवधी रुपये या प्रतिष्ठानच्या खात्यावर आले आहेत. त्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. आगामी काळात विक्रांत आणि टॉयलेट घोटाळ्यापेक्षा मोठे घोटाळे समोर येतील. जे स्वत: काचेच्या घरात राहतात त्यांनी इतरांवर दगड भिरकावू नये”, असं संजय राऊत म्हणाले.

“ज्या कंपन्यांविरोधात ईडीची कारवाई आणि त्याच कंपन्यांकडून युवक प्रतिष्ठानला कोट्यवधी रुपये कसे दिले गेले. याचा हिशोब त्यांना द्यावाच लागेल”, असंही संजय राऊत म्हणाले. त्यामुळे येणाऱ्या दिवसात संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Team Global News Marathi: