गायक के.के याचं मंगळवारी निधन झालं. अवघ्या 53 वर्षांच्या या गायकाने कोलकाता इथे झालेल्या कॉन्सर्टनंतर अखेरचा श्वास घेतला. हिंदीप्रमाणेच त्याने मराठीमध्ये गायलेली गाणीही बरीच गाजली होती. ‘केके’ने गायलेलं आणि सगळ्यांच्या ठसठशीत स्मरणात असलेलं गाणं होतं ते म्हणजे ‘सच कह रहा है दिवाना’, रहना है तेरे दिलमे या चित्रपटातील हे गाणं आजही लोकांच्या सार्वकालीक पसंतीच्या गाण्यांच्या यादीत समाविष्ट आहे.
अभिनेता आर.माधवन याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रहना है तेरे दिलमे’ या चित्रपटात माधवन याच्यावरच हे गाणं चित्रीत झालं होतं. या गाण्यामुळे चित्रपटाच्या प्रसिद्धीत बरीच भर पडली होती. केके याच्या निधनानंतर माधवन याने या गुणी गायकाला श्रद्धांजली वाहिली आहे. माधवन याने केके याच्या निधनानंतर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की ‘आज मी माझा आवाज हरवला’. त्याने केलेल्या दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्याने म्हटलंय की , ‘बंधू, तुझ्या आत्म्याला शांती लाभो, स्वर्ग भाग्यवान झालाय’
केके याची कोलकाता इथे कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात आपल्या आवाजाने कोलकातावासीयांना मंत्रमुग्ध केल्यानंतर केके याला हृदयविकाराचा झटका आला होता. हॉटेलच्या रुममध्ये तो हृदयविकाराचा झटक्यामुळे कोसळला होता. यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. केके याने हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि मराठी भाषेतील गाणी गायली होती.