मानवी मनोरे उभारून दहीहंडी साजरी करू नका; ठाकरे सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

 

मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव साधेपणाने घरी पूजाअर्चा करून साजरा करावा, दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक पूजाअर्चा किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये, हा उत्सव प्रतीकात्मक स्वरूपात साजरा करावा. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी दहीहंडी उत्सव एकत्रित येऊन साजरा करू नये. मानवी मनोरे उभारून दहीहंडी साजरी करू नये. त्याऐवजी रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे, असे गृहविभागाने म्हटले आहे. गृहविभागाने सोमवारी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये हे स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दहीहंडी, गणेशोत्सवासारख्या सणांमध्ये नागरिक एकत्र आल्यास त्या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे असे सण सामूहिकपणे साजरे करू नयेत, अशा सूचना केंद्र सरकारकडून आलेल्या आहेत. त्यांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. कोरोना निर्बंधांमध्ये दहीहंडीच्या काळात राज्य शासनाकडून सूट दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मात्र दुसरीकडे विरोधकांनी ठकरे सरकारवर हल्लबोल केला आहे. ठाकरे सरकार हिंदूच्या भावना पायदळी तुडविणारे सरकार आहे, असा आरोप मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे, तर राज्यातील ठाकरे सरकारला तालिबानकडून आदेश येतात का, असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. सरकारने कितीही प्रतिबंध केला तरी दहीहंडीचा उत्सव साजरा करणारच, असा इशारा मनसे आणि भाजप नेत्यांनी दिला आहे.

Team Global News Marathi: