पश्चिम बंगाल | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या विजयाचे श्रेय बिगर बंगाली मतदारांना दिले आहे. आपण ५८ हजार पेक्षा अधिक मतांनी विजयी झाल्याचे असे ममता बॅनर्जी यांनी आपल्या समर्थकांसह समोर बोलताना जाहीर केले.
भवानीपूररकडे सगळ्या देशाचे लक्ष होते. भाजपने मला पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडले. विधानसभा निवडणुकीत मला जखमी केले. पण मी बंगाली वाघीण आहे. त्यामुळे मी लढून जिंकले आहे. माझ्या सरकारला हैराण करण्यासाठी भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला. संपूर्ण बंगालने हे बघितले. बंगालची जनता माझ्या पाठीशी उभी आहे. भवानीपूरमध्ये ४६% बिगर बंगाली मतदारांनी मला मतदान केले आहे. त्यामुळेच माझा विजय झाला आहे, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेश आणि बिहार मधल्या लोकांना दररोजच्या प्रचार सभांमध्ये नावे ठेवणाऱ्या आणि त्यांच्यावर तोफा डागणाऱ्या ममता बॅनर्जींनी भवानीपूर मतदार संघात बिगर बंगाली मतदारांना विजयाचे श्रेय देणे यात कोणतेही रॉकेट सायन्स नाही. आता भवानीपूर जिंकून त्यांनी स्वतःचे मुख्यमंत्रिपद “सेफ” करून घेतले आहे. त्यांचा डोळा आता दिल्लीवर आहे. त्यामुळे केवळ बंगाली मतदारांवर अवलंबून राहून चालणार नाही. इतर भाषक मतदारांना सुद्धा चुचकारले पाहिजे या हेतूने त्यांनी भवानी पुढच्या विजयाचे श्रेय बिगर बंगाली मतदारांना दिले आहे.