महालक्ष्मी रेस कोर्स हलवण्यासाठी मुलुंड पाठोपाठ खारघरमधील सिडकोच्या जागेचा विचार

मुंबई महापालिकेला महालक्ष्मी येथील रेसकोर्स जागेवर थीम पार्क उभारण्याचा विचार आहे.त्यामुळे महालक्ष्मी रेसकोर्सची जागा पूर्ण आपल्या मालकीची व्हावी, यासाठी राज्य सरकारला पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आला आहे. मात्र, महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेत जर थीम पार्क साकारायचे असेल, तर मग रेसकोर्ससाठी पर्यायी जागा कोणती? याचा विचार मुंबई महापालिका आणि नगरविकास विभाग करत आहे.

याआधी मुलुंड डम्पिंग ग्राऊंड परिसरातील जागेचा विचार करण्यात आला होता. मात्र ही जागा व्यवहार्य नसल्याचं समोर आलं. कारण मुलुंडच्या जागेवर जर रेसकोर्स साकारायचं असेल तर त्यासाठी मुलुंड डम्पिंग ग्राऊंडच्या आसपासची खाजगी मालकीची जागा विकत घ्यावी लागणार आहे आणि त्याला शिवसेना ठाकरे गटाचा विरोध आहे. त्यामुळे आता मुंबई बाहेरील उरण आणि खारघरमधील सिडकोच्या जागेचा विचार रेस कोर्ससाठी करण्यात येत असल्याची माहिती आहे.

शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचे ( मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) काम अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबर 2023 पर्यंत या सागरी सेतूवरील वाहतूक सुरु करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. त्यामुळे हा सागरी सेतू वाहतुकीसाठी सुरु झाल्यास मुंबईतून नवी मुंबईत जाण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागतील. मुंबईकरांना रेसकोर्स उरण किंवा खारघर सिडकोच्या जागेत झाल्यास सहज ये जा करणे शक्य होऊ शकते, असा विचार केला जात आहे. मात्र हे सगळे पर्याय विचाराधीन असून कुठलाही प्रकारचा निर्णय झालेला नसल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Team Global News Marathi: