स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने लढणार राष्ट्रवादीचा निर्धार

 

मुंबई | जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका व नगरपंचायत निवडणूकांमध्ये पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय झाला असून याची सुरुवात दसर्‍यानंतर करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली. बुधवारी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व खासदार, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री यांची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली. त्यानंतर या बैठकीतील निर्णयाबाबत नवाब मलिक यांनी माध्यमांना माहिती दिली.

आगामी तीन – चार महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपंचायत यांच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणूकांची जबाबदारी मंत्र्यावर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाच्यावतीने शिबीरे, मेळावे व इतर तयारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निवडणुकीतील आघाडीचे निर्णय स्थानिक पातळीवर राहणार असून याबाबतची माहिती पालकमंत्री, संपर्कमंत्री आढावा घेऊन पवारसाहेबांकडे देणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

या बैठकीमध्ये संपूर्ण राज्यात लखीमपूर खिरी प्रकरणात शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बंद पुकारला होता. यामध्ये व्यापारी, कामगार संघटना व जनतेने सहभाग नोंदवला त्याबद्दल राष्ट्रवादीच्यावतीने आभार मानण्यात आले आहे. आता राष्ट्रवादीच्या या निर्णयावर मित्रपक्ष असलेले काँग्रेस आणि शिवसेना काय भूमिका घेतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: