लाखभर जनता पदरमोड करून मुंबईच्या रस्त्यावर का उतरली? याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा

 

मुंबई | महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी भायखळा ते आझाद मैदान असा झालेल्या मोर्चानंतर सुरू झालेले राजकीय आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चावर केलेली टीका ही मोर्चा यशस्वी झाल्याचा पुरावा असल्याचे शिवसेना ठाकरे गटाने म्हटले आहे. भाजपचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे फडणवीस-शिंदे सरकारचे श्रद्धास्थान आहे. त्यांचा अश्वारूढ पुतळा समृद्धी महामार्गाच्या प्रवेशद्वारावर सरकार उभा करेल असे लोकांना वाटू लागले असल्याचा टोला शिवसेना ठाकरे गटाने लगावला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखात आज मोर्चावर टीका करणाऱ्या भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. लाखभर जनता पदरमोड करून मुंबईच्या रस्त्यावर का उतरली? याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करणे आवश्यक असल्याचे शिवसेना ठाकरे गटाने म्हटले. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान होत असताना राज्याचे सरकार मूकबधिर होऊन बसले आहे.

कारण की दिल्लीने त्यांना गुंगीचे इंजेक्शन टोचून पाठवले आहे. या गुंगीचा असर ओसरला की, पुढचे इंजेक्शन देऊन सरकारला झोपवून ठेवले जाते. या गुंगीतून जागे करण्यासाठी मुंबईत त्वेषाने मोर्चा निघाला होता, असे ठाकरे गटाने म्हटले. तेव्हा हा मोर्चा ‘फेल’ होता असे सांगणे म्हणजे गुंगीचा असर न उतरल्याचे लक्षण मानावे लागेल व अशा लोकांची उरलेली गुंगी नागपूरच्या अधिवेशनात उतरवावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

शिवसेना ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शिवरायांचा अपमान करणारे भाजपचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे फडणवीस-शिंदे सरकारचे श्रद्धास्थान असल्याचे ठाकरे गटाने म्हटले. फडणवीस आणि इतर मंडळी या अपमानकर्त्याच्या इतक्या प्रेमात पडली आहे की, भगतसिंह कोश्यारींचा अश्वारूढ पुतळा उभारून हे लोक समृद्धी महामार्गाच्या प्रवेशद्वारावर उभारून त्यांच्या नावाने एखादे महाराष्ट्रगीत रचतात की काय असे आता जनतेला वाटू लागले, असा टोला लगावला आहे.

महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान गिळून ढेकर देणारे सरकार महाराष्ट्रप्रेमी मोर्चेकरांचा असा अपमान करीत आहे. मोर्चा फेल झाला असे छाती पिटून विकट हास्य करीत आहेत. ही एक प्रकारची विकृती असल्याचे ठाकरे गटाने म्हटले.

Team Global News Marathi: