‘आम्हाला महाराष्ट्राचा लवासा करायचा नाही’; मुख्यमंत्री शिंदेनी लगावला अजितदादांना टोला

 

आजपासून नागपुरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीवर आणि धोरणांवर आक्षेप घेत सरकारच्या चहापानावर बहिष्कार करत असल्याचे जाहीर केले. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हे सरकार स्थगिती सरकार असल्याची टीका केली होती. मात्र त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

स्थगितीच्या बाबतीत सांगाल, तर अनेक विभागामध्ये दोन हजार कोटींची तरतूद होती. प्रशासकीय मान्यता दिली सहा हजार कोटींची. हे काय कारभार चालला होता आघाडी सरकारमध्ये. आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या. पण, आम्हाला या राज्याचा लवासा करायचा नाही, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांची हवाच काढली. विभागांना मिळालेल्या तरतुदीनुसार निधीचे वाटप करायला पाहिजे. आमचे सरकार आल्यानंतर काही कामांना स्थगिती दिली आहे. ७० ते ८० टक्के कामांना मंजुरी दिली. आवश्यक त्या कामांवरील स्थगिती उठविली आहे. आकस ठेवून कुठल्याही कामांना स्थगिती दिलेली नाही.

पूर्वी शिवसेना-भाजप युतीचं सरकार होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर किती कामांना स्थगिती दिली. हे अजित पवार यांना माहिती आहे. कारण ते अर्थमंत्री होते. अजित पवारांच्या तोंडून खोक्यांची भाषा शोभणारी नाही आहे. खोक्यांचा एकावर एक ढिग लावला तर ‘शिखर’ इतके उंच होईल की, तिथेपर्यंत नजर पोहचणार नाही. तिथून कडेलोट होईल, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले.

तसेच आनंदाचा शिधा किती लोकांपर्यंत पोहचला याची आकडेवारीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली. ९६ टक्के लोकांना शिधा पोहचला असल्याचे सांगत अजित पवार यांच्या आरोपाची शिंदे यांनी हवा काढली.

Team Global News Marathi: