कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आणि म्हणाले, मी कोणत्याही दबावाला जुमानत नाही

पिंपरी: ‘शहरात ९९ टक्के लोक कायदा पाळतात परंतु, एक टक्का लोकांमुळे गुन्ह्यांना चालना मिळून ते घडविले जात आहेत. याप्रकारच्या लोकांनी हे लक्षात ठेवावे कायदा सर्वांना सारखा असून, मी कोणत्याही दबावाला जुमानत नाही’, अशा शब्दांत पिंपरी चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बजावले. कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.

पिंपरी चिंचवड शहराचा अभ्यास करून रूपरेषा ठरवली जाणार असल्याचे कृष्ण प्रकाश यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, राज्याचे औद्योगिक आणि आयटी हब म्हणून पिंपरी चिंचवडकडे पाहिले जाते. त्यामुळे येथील प्रश्न भिन्न असून, माथाडींच्या नावाखाली चालणारी गुंडगिरी मोडून काढली जाणार आहे. पांढरपेशा लोक वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून गुन्हे करीत आपला प्रभाव निर्माण करणारे असू शकतात. त्यामुळे या लोकांसाठी स्ट्रॅटेजी आखली जाणार आहे. लोकांनी बेकायदेशीर उद्योग करू नयेत. या बाबींना माझ्यालेखी थारा नाही. कायद्याला धरून काम करणाऱ्या प्रत्येक माणूस आणि पोलिसांच्या मी सदैव पाठीशी असणार आहे, असेही कृष्ण प्रकाश यांनी नमूद केले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: