कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर ठाकरे गटाच्या या आमदाराचे प्रकल्पाला समर्थन

 

आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर बारसूमधील रिफायनरी प्रकल्पाच्या परिसरातील वातावरण शांत झाले आणि सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्याचे काम प्रथम हाती घेण्यात आले. बहुतांश लोकांना ताब्यात घेतल्यानंतर दुपारी अत्यंत कमी आंदोलक बारसूच्या माळरानावर होते. झाडाच्या सावलीचा आधार घेत ते तेथेच बसून आहेत. मात्र वातावरण निवळले असल्याने सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

बारसूमधील रिफायनरीच्या प्रकल्पावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य सरकारच्या भूमिकेवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत राज्यातील महत्वाच्या सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहे. आज उदय सामंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही भेट घेणार आहे. याचदरम्यान ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या ट्विटची चर्चा रंगली आहे.

राजन साळवी यांनी आज ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच….माझ्या विरोध करणाऱ्या नागरिकांना प्रकल्पाची बाजू पटवून प्रशासनाने द्यावी, त्यांच्यावर अन्याय करू नये, अशी मागणी राजन साळवी यांनी केली आहे. तसेच राजन साळवी यांनी मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री कार्यालयाचे यांचे ट्विटवर अकाऊंट आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेन्शन केले आहे.

ग्रामस्थांनी केलेल्या विरोधामुळे वातावरण खूप तणावपूर्ण झाले होते. सकाळी ८ वाजल्यापासून पोलिस आणि इतर अधिकार्यांच्या गाड्या ग्रामस्थांनी अडवल्या. त्यामुळे वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. त्यांना रत्नागिरी जिल्हा मुख्यालयात नेण्यात आले. हे सर्वेक्षण नेमके किती दिवस चालेल, याची कोणतीच माहिती नसल्याने आणखी काही दिवस पोलीस बंदोबस्त तेथे कायम राहणार असल्याचे दिसत आहे.

Team Global News Marathi: