किरीट सोमय्यांचा पीएचडी प्रबंध सापडेना; आरटीआयच्या माध्यमातून माहिती आली समोर

 

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा पीएचडीचा प्रबंध विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. विद्यापीठाच्या पत्रातून ही बाब उघड झाली. युवा सेनेने माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नावर वाणिज्य विभागाने विद्यापीठ प्रशासनाला ही माहिती दिली.भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पीएचडी प्रमाणपत्राची मागणी युवा सेनेच्या किरण फाटक यांनी ३१ मे रोजी माहिती अधिकारांतर्गत विद्यापीठाकडे केली होती.

मात्र याबाबत विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाने या माहिती अधिकाराचे उत्तर ८ ऑगस्टला विद्यापीठ प्रशासनाकडे पत्राद्वारे दिले होते. त्यामध्ये वाणिज्य विभागाकडे किरीट सोमय्या यांच्या शिक्षणाविषयी माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. तसेच पीएचडी प्रबंधाची कोणतीही माहिती वाणिज्य विभागाने दिली नव्हती. मात्र विद्यापीठाने हे पत्र किरण फाटक यांना दिले नाही, असा आरोप युवा सेनेने केला आहे.
किरीट सोमय्या यांच्या पीएचडीबाबत विद्यापीठाकडून कोणतीही माहिती मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच विद्यापीठाकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केली. याबाबतची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पत्राद्वारे उपलब्ध करून दिली आहे, असे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आले.

Team Global News Marathi: