ठाकरे गटाने सभागृहात रान उठवलं, किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची महत्वपूर्ण घोषणा

मुंबई: राज्यातील भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ अशी ओळख असलेले भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. किरीट सोमय्या यांनी काही महिलांचे शोषण केल्याची माहिती आमच्या कानावर आल्याचे ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनातही या घटनेचे पडसाद उमटले. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि अनिल परब या दोघांनी या मुद्द्यावरुन विधानपरिषदेत अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

सभागृहात मांडण्यात आलेला हा विषय नक्कीच गंभीर आहे. राजकारणात अनेक वेळा असे प्रसंग येतात, ज्यात माणसाचं संपूर्ण राजकीय आयुष्य पणाला लागते, केलेली पुण्याई पणाला लागते. आता जो काही प्रकार समोर आला आहे, त्यासंदर्भात विरोधकांकडे काही तक्रारी असतील तर त्यांनी त्या आमच्याकडे द्याव्यात. आम्ही या सगळ्याची चौकशी करु. फक्त गृहितकांच्या आधारे चौकशी करता येणार नाही. त्यामुळे विरोधकांनी किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणात त्यांच्याकडे असलेले सबळ पुरावे आमच्याकडे द्यावेत. या सगळ्याची सखोल चौकशी केली जाईल. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. अशाप्रकारचे कुठलेही प्रकरण दाबले किंवा लपवले जाणार नाही. किरीट सोमय्या यांनी मला पाठवलेल्या पत्रातही तीच मागणी केली आहे. या सगळ्याची सखोल आणि वरिष्ठ स्तरावर चौकशी केली जाईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. परंतु, संबंधित प्रकरणात महिलेची ओळख जाहीर करता येणार नाही. त्यामुळे पोलीस या महिलेची ओळख पटवतील आणि कायद्याच्या चौकटीत राहून या प्रकरणाचा तपास करतील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणाच्या चौकशीतू काय माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

तर अनिल परब यांनीही किरीट सोमय्या यांच्यासंदर्भात गंभीर टिप्पणी केली. ज्यांना थोडी भीती वाटत होती, आपण कधी फाईल बघितलेय का, फाईलवर आपला शेरा आहे का, अशा महिलांना फोन करण्यात आले होते का? असे प्रकार घडल्याची माहिती माझ्याकडे आहे. किरीट सोमय्या यांनी गृहमंत्र्यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. त्यामध्ये सोमय्या यांनी मी महिलांवर अत्याचार केला नाही, असे नमूद केले आहे. याचा अर्थ हे व्हिडिओ खरे असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केल्याची शंका अनिल परब यांनी बोलून दाखवली.

Team Global: