तुळजापूरच्या वैभवशाली इतिहासाला साजेसे बस स्थानक साकारणार – आ. राणाजगजितसिंह पाटील

तुळजापूर येथील जुन्या बस स्थानकाचे नुतनीकरण करण्यात येणार असून प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांना आवश्यक सर्व आधुनिक सोयी सुविधांचा अंतर्भाव करण्यात येणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. यासाठी रु 3.61 कोटी निधी मंजूर असून आवश्यकतेनुसार वाढीव निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न राहणार आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनाला देशभरातून वर्षभर लाखो भाविक येतात. या भाविकांना व पर्यटकांना अगदी आगमनापासूनच आपल्या धार्मिक व ऐतिहासिक वारसा स्थळाविषयी सकारात्मक भावना निर्माण करणारे बस स्थानक उभारण्याची संकल्पना लवकरच साकारण्यात येत आहे. अशा वास्तू अनेक दशकात एकदाच उभारण्यात येत असल्याने विविध संकल्पना मागविण्यात येत आहेत. तुळजापूरच्या वैभवशाली इतिहासाला साजेसे बस स्थानक उभारण्यात येणार आहे.

या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापक (बांधकाम) यांना आवर्जून धाराशिव ला बोलावून त्यांच्या समवेत बैठक घेण्यात आली होती. त्यांनी बस स्थानकाला प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली होती. सदरील बैठकीमध्ये बसस्थानकाचे इलीव्हेशन ऐतिहासिक व धार्मीक पध्दतीने करणे, प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह सद्याचे वाहनतळ तात्पुरते दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच तुळजापूर येथील लातूर रोडलगत मराठवाडा कृषी विद्यापीठ व भात संशोधन केंद्राची १० एकर जागा नवीन आगार बांधण्यासाठी मागणी करण्याचे ठरले आहे. सदरील बैठकीस राज्य परिवहन महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापक (बांधकाम) श्रीमती विद्या भिलारकर, विभाग नियंत्रक रा. प. उस्मानाबाद सौ चेतना खिरवाडकर, विभागीय अभियंता (स्था) श्री शाशिकांत उबाळे, कनिष्ठ अभियंता श्री राहुल पवार आदी उपस्थित होते.

उस्मानाबाद शहरातील बस स्थानकाचे देखील आधुनिकीकरण करण्यात येणार असून स्थानकाचा मास्टर प्लॅन तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बसस्थानकाच्या पश्चीम व दक्षिण बाजूस व्यापारी संकुलाचा समावेश करण्याबाबत व्यवहार्यता तपासण्यास सांगण्यात आले आहे. या आराखड्याचे देखील सादरीकरण करण्यात येईल.

Team Global: