“भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना संपूर्ण विजयाचे श्रेय”, धनंजय महाडिक यांची पहिली प्रतिक्रिया

 

मुंबई | राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. महाराष्ट्रात सहा जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सहाव्या जागेसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. तर इतर जागांवर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंड विजयी झाले आहेत. दरम्यान, धनंजय महाडिक यांनी विजयी झाल्यानंतर संपूर्ण विजयाचे श्रेय भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

या विजयाचे फक्त आणि फक्त शिल्पकार कोण असतील ते आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी भाजपची संपूर्ण टीम आहे, यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अशिष शेलार, गिरीश महाजन, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांनी कठोर परिश्रम घेतले. आमच्यासाठी निवडणूक खूपच मोठी आहे, ज्या दिवशी मी अर्ज भरला त्यावेळी सुद्धा मी म्हणालो होतो फडणवीस यांनी संख्याबळाची बेरीज असल्याशिवाय तिसरा उमेदवार जाहीर केला नसता. आम्ही अर्ज दाखल केल्यानंतर आम्ही सांगितले होते भाजपचे उमेदवार निवडून येतील, असे धनंजय महाडिक म्हणाले.

महाविकास आघाडीकडून अनेकवेळा संख्याबळ सांगण्यात आले, त्यामुळे चारही उमेदवार निवडून यायला हवे होते. देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रणनीती आखली त्यामुळे भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विजय झाला असून हा ऐतिहासिक विजय आहे. ही लढाई भाजप विरुद्ध महाविकास आघाडीची होती,असे म्हणत धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या पराभवावर कोणतेही भाष्य केले नाही. संजय पवार आपले मित्र असल्याची भावना धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली

Team Global News Marathi: