“सेना तोंडावर आपटली… तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आले”; मनसेचा टोला

 

राज्यसभा निवडणुकीत शुक्रवारी मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. अखेरीस ९-१० तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची जवळपास ९ मते फुटली असल्याचे समोर आले आहे. शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. धनंजय महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आखलेली खेळी यशस्वी ठरल्याचे दिसून आले. याच दरम्यान मनसेने शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.

 

“सेना तोंडावर आपटली… तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आले” असं म्हणत मनसेने हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “राष्ट्रवादी समोर लाचारी पत्करून आणि औरंग्याच्या थडग्यावर नतमस्तक होणाऱ्या त्या निजामाच्या औलादीची मदत घेवून ही सेना तोंडावर आपटली… तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आले… विश्वप्रवक्ते संजय राऊत आणि टोमणे प्रमुखांनी सर्वसामान्य शिवसैनिकाचा बळी दिला…” असं गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

भाजपाचा पराभव करण्यासाठी आमचा पक्ष एमआयएमने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. एमआयएमच्या महाराष्ट्रातील दोन्ही आमदारांना काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगितले असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी ट्विटरद्वारे दिली. यानंतर यावरून मनसेने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. “जनता असंख्य अडचणींचा सामना करत असताना सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित निवडणुकीचा खेळ सुरू” असं म्हणत टीकास्त्र सोडलं होतं.

Team Global News Marathi: