जीवे मारण्याच्या धमकीनंतर पहिल्यांदाच सलमान सार्वजनिक कार्यक्रमात

 

गेल्या महिन्यात सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती तेव्हापासून सलमान खान सार्वजनिक ठिकाणी दिसणं किंवा एखाद्या कार्यक्रमात सहभागी होणं टाळत होता. पण, लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याच्या जवळपास दीड महिन्यानंतर आता सलमान खान पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सामील झाला आहे. 6 जून रोजी एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सलमान खान नुकताच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये दिसला. सलमान खान त्याची प्रस्तुती असलेल्या ‘विक्रांत रोणा’ या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला.

जीवे मारण्याची धमकी मिळाल्यापासून सलमान खानने कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली नव्हती. मात्र, तो सतत त्याच्या चित्रपटांचे शूटिंग करत होता. पण, सलमान खानने मुंबईतील वांद्रे येथील ‘ताज लँड्स एंड’ हॉटेलमध्ये पार पडलेल्या ‘विक्रांत रोणा’च्या प्रमोशनला कडेकोट बंदोबस्तात हजेरी लावली होती.

‘विक्रांत रोणा’चा प्रमोशन इव्हेंट सुरू होण्यापूर्वी साध्या वेशातील चार पोलीस बराच वेळ कार्यक्रमस्थळाची पाहणी करताना दिसले. ‘ताज लँड्स एंड’ हॉटेलच्या आवारात 3 गणवेशधारी पोलिसही उपस्थित होते. सलमानच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलिसांनी सुमारे 45 मिनिटे पाहणी केल्यानंतर, सलमान खानच्या टीमच्या लोकांना खात्री पटली की, या कार्यक्रमस्थळी सलमानला कोणताही धोका नाही. त्यानंतर काही वेळाने सलमान खान पोलीस आणि खासगी सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यासह कार्यक्रम स्थळी आला. सलमान जेव्हा कार्यकम स्थळापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट्समधील त्याच्या घरातून बाहेर पडला, तेव्हा सुरक्षेसाठी त्याच्या कारच्या मागे पोलिसांची जीपही धावत होती.

Team Global News Marathi: