उत्तर प्रदेश | उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कथित टूलकिट प्रकरणाची संपूर्ण देशात आता जोरदार चर्चा सुरु झालेली आहे. या टूलकिटमध्ये एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समर्थनार्थ ट्विट करण्यासाठी २ रुपये दिले जात असल्याचा उल्लेख केला गेला आहे. मुख्यमंत्र्यांसाठी सोशल मीडिया सांभाळणाऱ्या एका स्पेशल टीममधील सदस्यांची ही कथित ऑडिओ क्लीप असल्याचं म्हटलं जातं आहे.
सदर या कथित ऑडिओ क्लीप प्रकरणी उत्तर प्रदेशात अटकसत्र सुरू झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी आशिष पांडे, हिमांशु सैनी यांना अटक केली होती. या दोघांवर कट रचणं तसंच फसवणुकीचा आरोप ठेवण्यात आला. समोर आलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले आशिष पांडे हे सोशल मीडिया मॅनेजमेंटशी निगडीत एका कंपनीत काम करतात. पांडे हे राज्य सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालय यांचे सोशल मीडिया अकाऊंट सांभाळणाऱ्या टीमचा एक भाग होते, अशी माहिती मिळत आहे. पांडे यांच्या अटकेबद्दल अद्याप सरकार किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
मुख्यमंत्र्यांचे सोशल मीडिया अकाऊंट सांभाळण्याची जबाबदारी बीइसीआयएल नावाच्या कंपनीकडे होती. काही दिवसांपूर्वी या कंपनीकडून ही जबाबदारी काढून दुसऱ्या कंपनीकडे सोपवण्यात आली होती. तर ही कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर बीइसीआयएल कंपनीकडून आयटी सेल प्रमुख मनमोहन सिंह यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यानंतर ‘हजार जवाबों से अच्छी है हमारी खामोशी न जाने कितने सवालों की आबरु रख लेगी’ हे मनमोहन सिंह यांचं ट्विटही चर्चेत आलं होतं. सध्या हे प्रकरण चांगलाच गाजताना दिसत आहे.