माणसाने पैसे किती कमवावे,वाचा सविस्तर- पैसा – अपेक्षा व वास्तव

 

यशस्वी होण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते, मात्र यशासाठी लागणारी किंमत चुकवायची तयारी फारच थोडे लोक दाखवतात. जे लोक यशासाठी लागणारी किंमत चुकवतात, तेच लोक यशस्वी होतात. आपल्याकडे भरपूर पैसा असावा असे प्रत्येकाला वाटते, मात्र अनेक लोकांना भरपूर प्रमाणात पैसा मिळत नाही, त्यामुळे त्यांचे जगणे अवघड होऊन जाते.

 

पैसा ही संकल्पना आहे. वेगवेगळ्या काळात तिची रुपे बदलत गेली आहेत. महाभारताच्या काळात गोधन म्हणजे संपत्ती होती. ज्या राजाकडे सर्वात जास्त गाई असत तो राजा श्रीमंत समजला जायचा. अश्मयुगात ज्याच्याकडे भाला किंवा तत्सम शस्त्रे असणारा माणूस संपत्तीवान मानला जायचा. मधल्या काही दशकात समुद्रातले विशिष्ट प्रकारचे शिंपले ज्याच्याकडे असत तो श्रीमंत ठरत असे, त्याला कवड्या म्हणत.

गेल्या काही दशकात ज्याच्याकडे रोकड रक्कम जी नोटांच्या स्वरुपात असे ती जास्त असेल तो श्रीमंत ठरत असे. आज ज्याच्याकडे डिजीटल माध्यमातील पैसा आहे. तो माणूस श्रीमंत आहे. स्मार्ट आहे. येणाऱ्या काळात त्याची जागा कदाचित क्रिप्टो करंसी घेईल. काळानुरुप पैसा ही संकल्पना बदलत जाते. त्याची नावेसुध्दा बदलत जातात.

आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी करताना पैशाची चणचण भासू नये, एवढे पैसे प्रत्येकाने कमावले पाहिजेत. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, प्रत्येकाने किती पैसा कमावला पाहिजे? याचे काही ठोस उत्तर नाही; कारण प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या जगण्याच्या पध्दतीत फरक आहे. जीवनशैलीत फरक आहे. त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या पैसा प्रमाणात लागत असतो.

तारुण्यात आयुष्य मोठ्या प्रमाणात व भरभरुन जगले पाहिजे. मौजमस्ती किंवा इतर गोष्टींचा आनंद घेतला पाहिजे. तारुण्यातली सगळीच्या सगळे उमेदीची वर्षे केवळ पैसा गोळा करण्यात वाया घालवली, तर म्हातारपणी तो मिळवलेला पैसा उपभोगण्याची क्षमता उरेलच असे नाही. तारुण्याची बहारदार वर्षे सदाबहार जगण्यात जी मजा आहे त्याचा आनंद घेतला पाहिजे. आनंदाने जगण्याच्या संकल्पना म्हणजे मोठी साहसे करणे, जनमानसात आपल्या कर्तृत्वावाचा ठसा उमटवणे, यशाच्या शिखरावर जाणे, पर्यटनाचा आनंद लुटणे या गोष्टी आहेत.

 

आरोग्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टी, चारित्र्याची बदनामी करणाऱ्या गोष्टी मिळवणे म्हणजे सदाबहार जगणे नव्हे हे लक्षात घेतले पाहिजे. या सगळ्या गोष्टी पैशाने साध्य होतात. पैशाबद्दल या किमान अपेक्षा प्रत्येकाच्या असतात; याहून मोठ्या सुध्दा अपेक्षा असाव्यात.

पैशाबद्दल अपेक्षा कितीही असू शकतात, मात्र प्रत्यक्ष हातात येणारा पैसा आपल्या अपेक्षेएवढा असतोच असे नाही. कमावलेल्या पैशाचे योग्य नियोजन करुन आपल्याला आपल्या अपेक्षा पूर्ण करता येतात. कमी पडत असलेले पैसे उभारणीचे तंत्र अवगत करुन घ्यायला पाहिजे. पैसे उभारताना ज्यांनी मदत केली त्यांचे पैसे वेळेवर परत करण्याची कला आपल्याला साध्य झाली पाहिजे.

 

तरच अपेक्षेइतके पैसे मिळवता येतील. स्वप्न व सत्य यात अंतर राहणार नाही. प्रत्येक वस्तू खरेदी करताना आपली गरज आहे का? आपण तिचा वापर करणारा आहोत का? उपभोग घेणार आहोत का? या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे आली तरच खरेदी करा.

अन्यथा नको तिथे तो पैसा अडकून पडतो. आपण आयुष्यात अशा कितीतरी वस्तू व सेवा खरेदी केलेल्या असतात, त्याचा वापर आपण कधीच केलेला नसतो. कधीही न घातलेले कपड्याचे किती जोड कपाटात आहेत? त्यावर नजर टाका. नसतील तर उत्तम आहे, मात्र असतील तर थोडासा विचार करण्याची गरज आहे. फक्त कपडेच नाही तर इतर अजून गोष्टींचा विचार करा, ज्यांचा वापर केलेला नाही.

माणसाच्या गरजा त्याच्या उत्पन्नानुसार वाढत नाहीत. पाच हजार उत्पन्न असताना जेवढे अन्न लागत होते तेवढेच अन्न पन्नास हजार उत्पन्न झाल्यावर सुध्दा लागणार आहे. पाच हजाराचे उत्पन्न पन्नास हजार झाल्यावर दहापट खाणारा माणूस आजपर्यंत माझ्या निदर्शनास आलेला नाही.

 

आरामदायी वस्तूंच्या खरेदीच्या प्रमाणात वाढ होते, मात्र त्या वस्तू खरेदी करताना सुध्दा त्याचा वापर करणार आहोत का? आपल्याला त्याची गरज आहे का? त्या उपभोग घेण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे का? या तीन प्रश्नांची उत्तरे सकारात्मक आली तरच खरेदी करा

– अमोल चंद्रकांत कदम

 

#पैसा #मनी #गुंतवणूक #Paisa #Money #Investment #FinancialPlanning

ग्लोबल न्युज नेटवर्क: