महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण;अनेक मातब्बर नेत्यांना वॉर्ड बदलावे लागणार

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण;अनेक मातब्बर नेत्यांना वॉर्ड बदलावे लागणार

कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण झाली. सर्वच 81 प्रभागांचे आरक्षण निश्‍चित झाले असून आता शहरात रणधुमाळाली वेग येणार आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात ही प्रक्रिया पूर्ण झाली.

सोडतीसाठी या परिसरात इच्छुक उमेदवार व समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.सर्वपक्षीय प्रतिनिधी व नागरिकांसमोर पूर्ण पारदर्शीपणे ड्रॉ पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात आली.यामध्ये पहिल्या टप्प्यात अनुसुचित जाती प्रवर्गासाठीच्या प्रभागांची सोडत झाली.

त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण २२ प्रभागांचे आरक्षण निश्‍चित करून त्यापैकी ११ प्रभाग पुरूष व ११ प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. शेवटच्या टप्प्यात एकूण सर्वसाधारण प्रवर्गासाठीच्या ४८ प्रभागांचे आरक्षण काढण्यात आले. दरम्यान यंदाच्या सोडतीमध्ये मागील ३ निवडणुकांचे आरक्षण वगळून सोडत काढल्यामुळे मावळत्या महापौर निलोफर आजरेकर , उपमहापौर संजय मोहिते, विरोधी पक्ष नेते विलास वास्कर , ताराराणी आघाडी गटनेते सत्यजित कदम , काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांच्यासह मावळत्या सभागृहातील सुमारे ५५ नगरसेवकांना या आरक्षण बदलाचा फटका बसला आहे.

त्यामुळे याना आता इतर प्रभागाचा शोध घ्यावा लागेल अन्यथा ५ वर्षे घरीच बसावं लागणार आहे. हि आरक्षण सोडत अत्यंत पारदर्शी पार पडल्याची प्रतिक्रिया नागरिक आणि पक्ष प्रतिनिधींनी व्यक्त केली.

सोडतीनंतर प्रारूप प्रभागरचनेची अधिसूचना 23 डिसेंबरला राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल. 23 डिसेंबर ते 4 जानेवारीपर्यंत हरकती व सूचना देता येतील. ताराबाई पार्कमधील महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात सूचना व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्‍त झालेल्या हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाला ६ जानेवारीला सादर केले जाणार आहे.

#Kolhapur #Mahapalika #Election #December #Maharashtra

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: