जातीधर्माच्या भिंती पाडून कोल्हापुरात पार पडला हिंदू-मुस्लिम विवाह सोहळा

पुरोगामी विचाराचा वारसा लाभलेल्या कोल्हापुरात अनेकदा काहीतरी वेगळेच पाहायला मिळत असते. त्यात छत्रपती शाहू महाराजांनी दाखवलेल्या पुरोगामी विचाराचा वारसा जपण्याचे काम कोल्हापुरातील मुजावर आणि यादव कुटुंबीयांनी केले आहे.

या दोन्ही परिवारांनी जाती आणि धर्माच्या भिंती मोडून अगदी थाटात या दोघांच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलांचे लग्न लावून दिले आहे. मुलगा हिंदू धर्मीय तर मुलगी मुस्लिम आहे. मात्र, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या या कुटुंबांनी एकाच मंडपात हिंदू आणि मुस्लिम पद्धतीने आपल्या मुलांचा लग्नसोहळा पार पाडला आहे.

मुजावर आणि यादव कुटुंबीय एकमेकांना अनेक वर्षपासून ओळखत आहे. त्यात या दोन्ही परिवारांमध्ये मत्रीपूर्ण संबंध आहेत. यातूनच वधू मारशा नदीम मुजावर आणि मुलगा सत्‍यजित संजय यादव यांची ओळख झाली. गेल्या १० वर्षांपासून या दोघांची चांगली मैत्री होती. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

मात्र, मुलगा हिंदू तर मुलगी मुस्लिम धर्मीय असल्याने आपले भविष्यात लग्न होईल का हा विचार त्यांच्या मनात आला होता. मुलगा सिव्हिल इंजिनिअर तर मुलगी आर्किटेक्ट आहे. दोघेही उच्चशिक्षित असल्याने या दोघांनीही याबाबत घरच्यांना सांगायचे ठरवले.

सत्यजितने सुद्धा आपल्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. दोन्ही घरांचे मैत्रीपूर्ण संबंध जरी असले तरी लोकं काय म्हणतील याबाबत त्यांच्या मनात थोडा विचार केला. मात्र, आपल्या मुलांच्या आनंदाच्या पुढे काहीही मोठे नाही, असे म्हणत त्यांनीही लग्नाला होकार दिला. गेल्या वर्षी म्हणजेच लॉकडाऊनमध्ये मारशा मुजावर आणि सत्यजित यादव यांचा साखरपुडा झाला. तसेच या दोघांचे कोल्हापुरात मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला.

Team Global News Marathi: